पुणे : किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या शनिवारी घडली. या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रण झाले असूनही जखमीची फिर्याद घेण्याऐवजी पोलिसांनी आरोपीचीच फिर्याद तत्काळ नोंदवून घेतली. अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मात्र याची कल्पनाही नव्हती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या सेनादत्त पोलीस चौकीतील पवार नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने हा पराक्रम केल्याचे समोर आले आहे. अभिजित मच्छींद्र मारणे (वय २६, रा़ राजेंद्रनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे़ संवेदनशील माणसाला हादरवून सोडेल, असे हे सीसीटीव्ही चित्रण ‘लोकमत’ला उपलब्ध झाले आहे. आपल्यावर होत असलेला अन्याय मारणे यांनी ‘लोकमत’कडे मांडला. प्राणघातक हल्ला होऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मच्छींद्र मारणे यांचे कुटुंब हादरून गेले आहे. याबाबत मारणे यांनी सांगितले, की धनंजय शिवाजी मोरे या त्याच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या तरुणाने अभिजित याच्यावर प्राणघातक हल्ला केला. २५ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास अभिजित पार्किं गमधून दुचाकी काढत असताना मोरे याने त्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घातली़ बेशुद्ध झालेल्या अभिजितच्या कंबरेवर, छातीवर, डोक्यावर आणि पायांवर मोरे याने पाच ते सहा वेळा दगड घातल्याचे सीसीटीव्ही चित्रणामध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, अभिजितला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सर्वजण तिकडे गेल्याचा फायदा घेत मोरे याने सेनादत्त पोलीस चौकीत धाव घेतली. तेथे पोलीस कर्मचारी पवार यांना मोरे याने आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. त्याच्या तक्रारीचा ‘अर्थ’ समजल्यामुळे पवारांनी तातडीने त्याची तक्रार दाखल करून घेतली.ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी चौकीमध्ये जाऊन गोंधळ घातला. मोरेवर किरकोळ कारवाई करून सोडून देण्यात आले. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कुटुंबीयांनी भेट घेतली. घटनेच्या सात दिवसांनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आता प्रकरण मिटविण्यासाठी पोलीस दबाव टाकत आहेत़ (प्रतिनिधी)
प्राणघातक हल्ला बेदखल
By admin | Published: May 04, 2015 3:22 AM