पिंपरी : भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. कलतक बटे तो कटे थे, पर अब बटेंगे नही, तो कटेंगे भी नही, एक रहेंगे, सेफ रहेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्या, महेश लांडगे यांना निवडून द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी विक्रमी गर्दीची जाहीर सभा झाली. भोसरीने आज भगवे वादळ अनुभवले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली.
व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, निरीक्षक प्रदीपसिंह जडेजा, भाजपाचे शत्रुघ्न काटे, सुजाता पालांडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, नितीन लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मंगला कदम, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट, शिवसेनेचे संभाजी शिरसाट, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
२५ मिनिटांचे भाषण, अपूर्व उत्साह !
हिंदुत्व, समतावाद, देशाचा गौरव, महाराष्ट्राची अस्मिता, प्रखर राष्ट्रवाद या मुद्यांचा उहापोह योगींनी त्यांच्या २५ मिनिटांच्या भाषणांत घेतला. 'भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज की जय, वंदे मातरम असा जयघोष करून योगी यांनी मनोगतास सुरुवात केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
योगी आदित्यनाथ म्हणाले, ' महाराष्ट्र -पुणे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान करणारी आहे. आजही देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्यांच्याविषयी गौरवाने बोलले जाते. स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशामध्ये काँग्रेसची राजवट होती. त्या कालावधीत पाकिस्तान भारतात घुसखोरी करीत होते. दहशतवादाला खतपाणी घालत होते. हिंसक घटना घडत होत्या. त्याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवत होतो. परंतु, संबंध बिघडतील या नावाखाली दहशतवादाला थोपविण्याचे धाडस कोणी केले नाही, याकडे लक्ष वेधून योगी म्हणाले, २०१४ नंतर नवीन भारत उदयास आला आहे. त्यामुळे पाकिस्तानही हिंमत होत नाही. ते छेडतील तर आम्ही सोडणार नाही. घुसून लढाई करू. ही जाणीव झाल्यामुळे हातात कटोरी घेऊन पाकिस्तान जगामध्ये भीक मागत फिरत आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, 'काँग्रेस ही समस्या आहे आणि भाजप समाधान आहे. काँग्रेसच्या राजवटीत दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचव्या क्रमांकावर आणली आहे. ती पुढील दोन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्दीष्ट आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. हा विकास संस्कृतीचा सन्मान करणारा आहे. अयोध्यामध्ये राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. या दर्शनासाठी आणि पुढील वर्षी प्रयागराजला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मी भोसरीला, पुण्याला आमंत्रित करीत आहे.
महाआघाडी नव्हे महाअनाडी
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या सब का साथ, सब का विकास संकल्पनेला बळ देत आहे. देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे, असे नमूद करून योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. त्यांच्याकडे नितीमत्ता नाही. योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही, अशी टीका केली.
हम साथ रहेंगे
उमेदवार महेश लांडगे म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरीमध्ये सभा घेतल्यामुळे माझ्यासारखा दुसरा भाग्यवान नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व नजरेसमोर ठेवून कार्यरत आहे, उपेक्षितांना आधार, महिलांना सुरक्षा, संत विचारांचा वारसा जतन करीत आहेत. त्यामुळे हम ना बटेंगे, ना कटेंगे, हम साथ रहेंगे.'