पुणे : शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. या निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने पुण्यातील कार्यालया बाहेर जल्लोष केला. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी पुतळा येथे काळे झेंडे घेउन निषेध आंदोलन केले. या निकाला विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरविण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सारसबागेजवळील कार्यालया बाहेर जल्लोष केला. शिवसेना जिंदाबाद , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असेा अशा घोषणा यावेळी देण्यात दिल्या. महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिपक मानकर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमख प्रमोद नाना भानगिरे यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी पुतळा येथे काळे झेंडे घेउन निषेध आंदोलन केले. शिवसेना ठाकरेचीच अशा जोरदार घोेषणा दिल्या. लवादाने केला लोकशाहीचा घात आणि विधानसभा अध्यक्षाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक विशाल धनकवडे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
हा सत्याचाच विजय असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापित केलेले सरकार हे कायद्याद्वारे व संविधानिक तत्वाने स्थापन झालेले सरकार आहे. न्यायदेवतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य असून, नाथाळाच्या माथी मारू काठी या उक्तीप्रमाणे आजपर्यंत जे म्हणत होते की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही त्यांच्या माथ्यावर आज काठी बसण्याची हीच ती वेळ. आजच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, शिंदे सरकार इथून पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करेल असे शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.