पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर आता एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे. ईडीकडून खडसे यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी जाहीर सभेत, ''मला जर ईडीच्या कारवाईची धमकी द्याल तर मी ईडीची सिडी लावेल'' असा गर्भित इशारा दिला होता. मात्र,जावई गिरीश चौधरी यांची अटक ही खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अॅड.असीम सरोदे हे पुणे न्यायालयात दावा खटला चालवत आहे. या प्रकरणावर भाष्य करताना असीम सरोदे म्हणाले, या प्रकरणी जी उपलब्ध कागदपत्रं आहेत. त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी आहे. तसेच हा भ्रष्टाचार घडवून आणण्यामध्ये ते महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे इतरांना अटक होईल आणि त्यांना होणार असे नाही. त्यांनी पत्नी आणि जावई यांचे बँक खाते वापरून पैसा फिरवला आहे. खडसे मंत्री असूनही त्यांनी हे सर्व घडवून आणले. त्यांची आधी चौकशी झाली होती. आता जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सरोदे पुढे म्हणाले, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी महत्वाची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी वेगवान पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी मुख्य भाग म्हणजे बनावट कंपन्यांच्या नावाने मनी ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. ५० ते ६५ लाखांच्या रकमा अनेक खात्यांमधून ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ते काढण्यात आले आहे.
मंत्री असताना खडसे यांनी स्वतः निर्णय घेऊन सर्व व्यवहार बदलले आहेत. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन अहवालात देखील बरेचसे फेरबदल केले. अंजली दमानिया यांनी कोर्टात दाखल केलेल्या पत्रांवरून सर्व गोष्टी ईडीच्या लक्षात आल्या आहेत. त्यांनी पूर्णतः अभ्यास करून ही कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. त्याशिवाय गैरव्यवहारात समोर आलेल्या सर्व कंपन्या बोगस आहेत. हे सिद्ध करण्यासाठी त्या स्वतः कंपनीत गेल्या असून त्या ठिकाणी कंपन्या नसून पूजेच्या साहित्यासह इतर दुकाने आहेत. या सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या असताना कारवाई पूर्ण होण्याची वाट आम्ही पाहतोय.
अटकेपासून एकनाथ खडसे असं मिळू शकतात संरक्षण? एकनाथ खडसे यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने ते अटकपूर्व जामीन मागण्याची शक्यता आहे. त्यावर त्यांना काही दिवसाचे संरक्षण न्यायालय देऊ शकते,. पण ते फार वेळ नसून तात्पुरत्या स्वरूपाचे संरक्षण असणार आहे. त्यामुळे खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे हे निश्चित आहे.
नेमकं काय प्रकरण? एकनाथ खडसे महसूलमंत्री पदावर कार्यरत असताना पुण्यातील भोसरी येथील ३.१ एकरचा भूखंड पत्नी आणि जावई यांच्या नावे खरेदी केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मूळ किंमत ३१ कोटी असलेल्या भूखंडाची निव्वळ ३. ७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला आहे. भोसरी एमआयडीसी येथील हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता. परंतु याप्रकरणी न्यायालयात खटला प्रलंबित असतानाच खडसे यांनी २०१६ मध्ये बैठक बोलावत उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केली होती.