पुणे : एकनाथ खडसे हे मानसिक संतूलन बिघडलेले नेते आहेत, त्यांच्यावर मला काहीच बोलायचे नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या रेसमधील माणूस आहे असे सांगणाऱ्या खडसे यांची सध्याची राजकीय अवस्था बीकट आहे व तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते अशी टीका भाजपाचे नेते, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
महाजन म्हणाले, मी ६ वेळा निवडून आलो. खडसे पक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यांना कुठेही यश मिळालेले नाही. महाजनला मीच मोठा केला असे ते म्हणत असतील, त्यांना मला व आणखी कोणालाही काय, पक्ष मोठा करत असतो. त्यांनी कोणाला मोठे केले असते तर मग त्यांचा गावातल्या निवडणूकीपासून ते थेट राज्यातील निवडणूकीपर्यंत पराभव का होतो आहे. त्यांनीच याचा विचार करावा.
दोन्ही भूमिका सारख्या असतील तर तो योगायोग
राज ठाकरे यांनी त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला आहे. भोंगा वगैरेबाबत ते बोलत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. भाजपाची स्वत:ची अशी भूमिका आहे, त्याचा व राज ठाकरे यांच्या इशाऱ्याचा काहीही संबध नाही. दोन्ही भूमिका सारख्या असतील तर तो योगायोग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवला जावा असे आमचे म्हणणे आहे, भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक प्रश्न आहे हे ठाकरे यांचे म्हणणे योग्य आहे असे महाजन म्हणाले.
सरकारच कटकारस्थानात गुंतले आहे
देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून विधानसभेत दिलेले पुरावे गंभीर आहे. सरकारच कटकारस्थानात गुंतले आहे असे त्यातून स्पष्ट दिसते. म्हणूनच आम्ही याची सीबीय चौकशी करावी अशी मागणी केली. सरकारने सीआयडी चौकशी लावली ती आम्हाला मान्य नाही असे महाजन यांनी सांगितले.