पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत असून, यावेळी ते अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच शहरातील विविध विकासकामांबाबत आढावा घेणार आहेत. जेजुरी सासवड येथील कार्यक्रम आटोपून शिंदे सायंकाळी शहरात असून, शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरेही सायंकाळी जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे अशी जुगलबंदी रंगणार असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्तालयात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी पाऊणला ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते तुकाई दर्शन टेकडी येथील फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट देतील. शिंदे दुपारी अडीचच्या सुमारास जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेतील. त्यानंतर ३ वाजता शिवसेनेच्या जाहीर सभेस संबोधित करतील. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी नुकताच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून शिंदे हे सर्मथकांच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत. तशीच सभा ते सासवड येथेही घेत आहेत. सासवड येथील पालखी तळ मैदानावर ही सभा होईल.
त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता ते हडपसर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम हांडेवाडीतील जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी होणार आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर व दत्त मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ९ वाजता गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांच्या आगामी उत्सवासंदर्भात बैठकीस उपस्थिती लावणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर सभागृहात ही बैठक होईल. रात्री ९.४५ वाजता कोथरूड येथून मोटारीने ठाण्याकडे रवाना होणार आहेत.
दोघांच्या बोलण्याकडे लक्ष
शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही राज्याचा दौरा करत असून, पुण्यातही त्यांची जाहीर सभा होणार आहे. कात्रज चौकातील बस आगाराजवळ सायंकाळी ५ वाजता त्यांची ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे एकाच दिवशी शहरात असल्याने ते नेमके काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.