पुणे: दीड लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातने पळवला. आता उपमुख्यमंत्री म्हणतात पुढच्या २ वर्षात महाराष्ट्राला पुढे नेऊ. ते सोडा, तुम्ही ५ वर्षे सत्तेवर होता त्यावेळी गुजरातला कायकाय दिले त्याची यादी द्या अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले. राज्यातले सरकार केंद्रीतीत मोदी शहा यांचे गुलाम आहे असे ते म्हणाले.
काँग्रेसभवनमध्ये पक्षाच्या ओबीसी आघाडीने आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण मंथन परिषदेचे उदघाटन शनिवारी सकाळी पटोले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी राज्यातील भाजप-शिंदेसेना सरकारला लक्ष्य केले. पक्षाच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, नोटाबंदीच्या काळात देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. त्यातून मिळालेला पैसे मोदी सरकारने राज्यांमधील निवडणुकांसाठी वापरला. याच पैशातून आमदार विकत घेतले जात आहेत. आमच्यातून कोणी जाणार नाही याचा विश्वास आहे, मात्र कोणाच्या मनात काय सुरू आहे ते सांगता येत नाही. काँग्रेसने देश उभा केला म्हणून मोदींना आता तो विकता येत आहे.
राधाकृष्ण विखे त्यांचा भ्रष्ट्राचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये गेले अशी टीका पटोले यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही दहिहंडी, गणेशउत्सवातील नाचगाण्यातच रमले आहेत. त्यांच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. फडणवीस यांनी गमजा मारण्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी सत्तेवर असताना गुजरातला कायकाय दिले ते सांगावे असे ते म्हणाले.
मोदी ओबीसी आहेत असे भाजप सांगत असल्याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले, मोदी ओबीसी नाहीत. भाजप खोटे सांगत आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत, योग्य वेळ येताच ते जाहीर केले जातील. बांठिया आयोगाने आडनावे विचारून ओबीसींची संख्या ठरवली जे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेच आता अधिकृतपणे देशातील ओबीसींची जनगणना करावी.