पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एंट्री केली आहे. इतकेच नाही, तर राष्ट्रवादीचे तब्बल ३३ आमदारही भाजपच्या गोटात सामील झाले असल्याने अनेकांची गोची झाली आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा आमदार आहेत. त्या ठिकाणी विरोधक असलेल्यांनी आगामी निवडणुकीची माेर्चेबांधणी सुरू केली होती; मात्र आता शिंदे-फडणवीस-पवार या नव्या समीकरणामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर या विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर दौंड भाजप आणि पुरंदर व भोर येथे काँग्रेस आहे. या मतदारसंघातील निवडणुकीचे सूत्र ठरलेले आहे; मात्र अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ३३ आमदारांसह भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने संपूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत. अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या चार वर्षांपासून उमदेवारी मिळेल, या आशेने तयारी केली होती; पण सर्व उलटंच झालं असल्याची खंतही काही इच्छुकांनी बोलून दाखविली. आता तिकीट मिळेल की नाही, अशीच शंका वाटत असल्याचेही काहींनी बोलून दाखविले.
नेते, पदाधिकारी एकीकडे, कार्यकर्ते दुसरीकडे
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाकडे आहेत. तर आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. तर उर्वरित चार आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत. अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी हे अजित पवार गटात सामील हाेत असले, तरी अपवाद वगळता कार्यकर्ते मात्र शरद पवार गटातच राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि इच्छुकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. कोणत्या गटात जायचे? असा प्रश्न सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आहे. कार्यकर्ते काहीही झाले तरी शरद पवार गट सोडायला तयार नाहीत. तर दुसरीकडे अजित पवार गटात सामील झालेले आमदार विकासकामांसाठी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत असल्याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे.
दौंड, इंदापूर, जुन्नरमध्ये उमेदवारी रस्सीखेच
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे; परंतु तिकिटे माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार गटात सामील झाले आहे. गेल्या अनेक दिवंसापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. ते आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे इथल्या उमेदवारीचा प्रश्न अडगळीत आहे. इंदापूरलाही तीच अवस्था आहे. येथे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत. तर भाजपचे हर्षवर्धन पाटील हेही इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वीची परिस्थिती पाहिली तर पाटील-भरणे हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात; मात्र नव्या समीकरणामुळे दोघांचीही गाेची झाली आहे. आता वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल तो मान्य असल्याचे दोघेही म्हणत असले, तरी उमदेवारीबाबात दोघेही साशंक आहेत.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी विरोध नको म्हणून थेट आमदारकी लढविणार नसल्याचे जाहीर केले; मात्र त्यानंतर लगेचच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार अतुल बेनके यांची नारायणगावला भेट घेत अजित पवार गटात सामील होण्याचे निमंत्रण दिले. तर खेडमध्ये पोहोचताच भुजबळ यांनी आमदार बेनके हे आमचेच असून, ते लवकरच येतील असे ठामपणे सांगितल्याने तालुक्यात दुसरा कोणी विरोधक नको म्हणून खुद्द आमदारांनीच तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे आता तिथेही शिंदे गट-भाजपची घुसमट सुरू झाली आहे.