पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार आहे. पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे बूथ लेव्हलचे अध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे. राज्य सरकार निवडणुकीची तयारी करीत असून कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देण्यासाठी तातडीची योजना जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच या नेमणुका होणार आहेत.त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे केवळ पंधरा दिवसात या नेमणुका होणार आहेत.