अजित पवारांच्या काटेवाडीत शिंदे - फडणवीसांचा निषेध; सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:22 PM2023-09-03T15:22:56+5:302023-09-03T15:29:13+5:30
जालना येथील सर्वस्वी घटनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार
काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बारामती इंदापुर रस्त्यावर एसटी स्टॅन्ड परिसरात एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत काटेवाडी ग्रामस्थ, व सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती इंदापुर रस्त्यावर च ठिय्या माडला.
यावेळी बोलताना संभाजी बिग्रेड प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, जालना येथील सर्वस्वी घटनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. या ठिकाणी आंदोलनावर अमानुषपणे बेधुंद लाठी हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. लहान मुले, पुरुष ,महिला यांना देखील सोडले नाही. आमचा पोलिसांवर रोष नाही. वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले. मात्र त्यांना आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आमचा राग आहे. मागील सात वर्षांमध्ये राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र कसलाही अनुचित प्रकार त्यावेळी घडला नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. जालना येथे काही दिवसात शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमास आंदोलन अडचणीचे ठरेल म्हणून पोलिसी यंत्रणेच्या बळाचा वापर करत शांततेत सूर असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणच्या आंदोलकांवर तसेच युवक महिलांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून अमानुषपणे केलेला लाठीहल्ला हा सर्व प्रकार चीड आणणारा असून मराठा समाजाच्या भावना दुखवणार आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे संभाजी बिग्रेडचे प्रदेश कोषाध्यक्ष काटे यांनी सांगितले.