पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला बिबट्याची सफारी करण्यास मान्यता दिली होती. तोच प्रस्ताव आता पुन्हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथे होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. १५) निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्नरकरांमध्ये खुशी आणि बारामतीकरांमध्ये गम अशी स्थिती आहे. आंबेगव्हाण येथे वन विभागाची ४०० हेक्टर जमीन आहे. त्यातील १०० हेक्टरवर हा सफारीचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
बिबट सफारीचा मूळ प्रस्ताव हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथील होता, पण अजित पवारांनी तो फिरवला. त्यावर जुन्नर तालुक्यातून चांगलाच विरोध झाला होता. नागरिकांनी त्या विरोधात आंदोलनेही केली होती. बिबट्या सफारी बारामतीच्या स्थलांतराच्या निषेधार्थ माजी आमदार शरद सोनवणे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. बारामतीमध्ये बिबटे नाहीत, मग सफारी तिकडे कशाला? असा सूरही तेव्हा जुन्नरकरांनी लावला होता. याच सुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपला सूर लावून बारामतीचा प्रस्ताव रद्द करून जुन्नरला करण्यासाठी मान्यता दिली. तसेच सफारीचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश पर्यटन विभागाला दिले आहेत.
बारामती सफारीचे काय होणार?
महाविकास आघाडी सरकारच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बिबट्या सफारी पार्क पुणे वनविभागात प्रस्तावित करत, त्यासाठी ६० कोटींची तरतूद केली होती. ही बिबट्या सफारी बारामती तालुक्यातील गाडीखेल येथे होणार होती, पण आता एकनाथ शिंदे यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान देऊन प्रकल्प जुन्नरला दिला आहे.