पुणे : कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले आहे. गिरीश बापट यांना आम्ही आजारी असल्यामुळे प्रचारात येऊ नका असं सांगितले पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी प्रचारात येऊन हेमंत रासणे यांना बळ दिले. मुंबईत आम्ही उमेदवाराचा भरलेला फॉर्म माघारी घेतला. पण इथं तसं घडलं नाही. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. आमची इच्छा होती की कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी पण मविआने ते होऊ दिलं नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. त्यावेळी ते बोलत होते.
पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने रोड शो काढण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली होती.
कोणताही आयोग असूदे रिझल्टला महत्त्वाचा-
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही लोकांना सामोरे जाणारे आहोत. एमपीएससीच्या आंदोलनाला जे यश आले आहे त्याचे कोणतेही श्रेय आम्हाला घ्यायचं नाही. विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे तीच सरकारची भूमिका असणार आहे. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो. एमपीएससीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द दिला तो आम्ही पूर्ण केला. माध्यमांशी बोलताना माझ्या तोंडून चुकून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा शब्द वापरला गेला. कोणताही आयोग असूदे रिझल्टला महत्त्व आहे. रिझल्ट देण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद झोकून दिल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्तांतरानंतर थेट मतदारांचा कौल आजमावण्यासाठीची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणतीही कसर सोडायची नाही, या निर्धाराने भाजपने प्रचार यंत्रणा आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत.