CM Eknath Shinde on Amit Shah : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते. यावेळी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह हे दिलेला शब्द पाळतात असं म्हटलं.
“अमित भाई दिलेला शब्द पाळतात. दिलेला शब्द त्यांच्यासाठी पत्थर की लकीर असते. मला तसे ते म्हणाले होते आणि त्यांनी आपला शब्द पाळला,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. त्याची प्रचिती मला डाओसमध्ये आली. बऱ्याच देशाचे प्रमुख मंत्री त्याठिकाणी आले होते. नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाविषयी फार आदराने बोलत होते, असंही ते म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था उंचावर नेली. देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर नेली. जी २० चे प्रतिनिधीत्व आपण केलं, ही फार अभिमानाची गोस्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. म्हणूनच त्यांची कीर्ती जगभर पसरली. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे,” असं त्यांनी नमूद केलं. बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी कलम ३७० हटवतो. ३७० कलम हटवण्याचं काम अमित शाहंनी केलं, राम मंदिराचं काम लवकरच होईल म्हणून लोकांच्या मनात जे आहे तेच आम्ही केलं. काही गोष्टी वेळेवर होतात, कालही एक गोष्ट झाली,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस? आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते लाभले. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे. केवळ भारताचे पंतप्रधान एवढ्यापुरते ते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण विश्व ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहते, अशा प्रकारचे नेतृत्व पंतप्रधान मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.