Eknath Shinde on Uday Samant Attack लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शिवसेनेतील बंडखोर आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. "गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे", असे ते म्हणाले.
नक्की काय घडलं?
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कात्रज परिसरात येणार होते. त्यामुळे या परिसरात अगोदर पासून तणाव होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. आदित्य ठाकरे हे सभेनंतर थेट मुंबईला जाणार होते. ठाकरे यांनी अचानक शंकर महाराज मठाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्वारगेटकडील रस्ता पोलिसांनी क्लिअर केला. तोपर्यंत ठाकरे यांचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे अगोदर गेली. मात्र उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. त्यावेळी सभा संपल्यानंतर संपूर्ण चौकात शिवसैनिकांनी भरला होता.
उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पहाताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली. यावेळी उदय सामंत म्हणाले, "माझ्या गाडीवर झालेला हा भ्याड हल्ला आहे, गाडी सिग्नलला थांबली असताना २० ते २५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या हातात दगड व बेसबॉल स्टिक्स होत्या. हा हल्ला म्हणजे पुर्वनियोजित षडयंत्र आहे. मला आदित्य साहेबांची सभा आहे याची कल्पना नाही. माझी गाडी केवळ सिग्नलला थांबली होती. त्यावेळी ठरवून हा हल्ला झाला. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही.याबाबत मी मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर घातले आहे, माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी", अशी मागणी उदय सामंत यांनी केली.