लोणावळा : पुणे जिल्ह्यातील संतसरिता इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात सुमारे ५०० फूट उंच डोंगरमाथ्यावर बुद्धकालीन कार्ला लेणीच्या निसर्गरम्य वातावरणात महाराष्ट्राची कुलस्वामिनी व कोळी बांधवांचे आराध्य दैवत एकवीरादेवी स्थानापन्न आहे.लोणावळा शहरापासून अवघ्या आठ किमी अंतरावर वेहेरगावच्या निसर्गरम्य डोंगरकड्यावर श्री एकवीरादेवीचे मंदिर आहे. मंदिराशेजारी बुद्धविहार असल्याने परिसराची रम्यता व आल्हाददायीपणा वाढला आहे. बौद्धकालीन कार्ला लेणी व वरदायिनी एकवीरा आईचे पुरातन देवालय इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे. इ. स. पूर्व पहिल्या शतकात या ठिकाणी शिल्प कोरण्यात आली आहेत. या ठिकाणी एक भव्य चैत्यगृह आहे. तेथील सभागृह १२५ फूट लांब व ४५ फूट रुंद असून, सभा मंडपातील स्तंभावर कोरीव काम करण्यात आले आहे. सिंहस्तंभ, कोरीव काम, अंधारी गुंफा या कारणास्तव हे ठिकाण प्रेक्षणीय असून, १९०६ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे.कार्ला येथील शिल्पे उशवदत्त शकाधिपती राजाने इ. स. १२०मध्ये बांधली असल्याचा उल्लेख सापडतो. सन १८६६मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा एक माहितीपर शिलालेख या ठिकाणी आहे. मंदिराच्या घंटेवरील १८५७ ही अक्षरे मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. श्री परशुरामाची आई रेणुका हीच एकवीरा या नावाने ओळखली जाते. भारतभरात रेणुकेची जी जी स्थाने आहेत, ती सर्व एकवीरा देवीची स्थाने म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रातील थोर संत एकनाथमहाराज यांची एकवीरा ही कुलदेवता आहे. आई एकवीरा मातेची कहाणी स्कंदपुराण, महाभारत, गणेशपुराण, कालीपुराण यामधून सांगितली गेली आहे. नवसाला पावणारी, कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकवीरेचे वेगळे स्थान व महत्त्व आहे. गडावर वर्षातून दोन वेळा देवीची यात्रा भरते. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र शुक्ल अष्टमीला कोळी यात्रा अशा या दोन्ही यात्रांना देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गडावर येतात. या भाविकांना सुखसोयी देण्याचे काम या ठिकाणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुरू आहे. अत्याधुनिक दर्शनरांग उभारली आहे. इतरही सुविधा उपलब्ध केले आहेत. (वार्ताहर)
एकवीरा आई तू डोंगरावरी...!
By admin | Published: October 04, 2016 1:18 AM