आनंदाची बातमी! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; 'एल निनो' झाला होता विलंब
By नितीन चौधरी | Updated: June 8, 2023 14:44 IST2023-06-08T14:41:51+5:302023-06-08T14:44:37+5:30
मॉन्सूनच्या आगमनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची खोली दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या मध्यभागापर्यंत पोचली आहे...

आनंदाची बातमी! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; 'एल निनो' झाला होता विलंब
पुणे : सहसा १ जून रोजी दाखल होणारा मॉन्सून यंदा एल निनोच्या सावटाखाली अखेर गुरुवारी (दि. ८) केरळमध्ये एक आठवड्याच्या अंतराने दाखल झाला आहे. गेल्या दोन दशकांचा विचार करता केवळ दोनदाच मॉन्सून आठ जूननंतर केरळमध्ये दाखल झालेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या २४ तासांत मॉन्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्येकडील राज्यांत पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
केरळमध्ये चांगला पाऊस
मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी मॉन्सून केरळमध्ये सात दिवसांच्या उशीराने दाखल झाला. त्यासोबतच मॉन्सूनने दक्षिण व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तमिळनाडूचे काही प्रदेश, कौमारीनचा संपूर्ण प्रदेश, मन्नारचे आखात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, मध्य व ईशान्य भाग व्यापला आहे.
मॉन्सूनच्या आगमनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची खोली दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या मध्यभागापर्यंत पोचली आहे. या वाऱ्यांची तीव्रता खालच्या स्तरात वाढली आहे त्यामुळेच गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे.
प्रगतीस अनुकुल स्थिती
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून तो मध्य अरबी समुद्राच्या आणखीन काही भागांमध्ये, केरळच्या उर्वरित भागांमध्ये तसेच तमिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम मध्य व ईशान्य भागात मॉन्सून पोचणार आहे.
गेल्या दोन दशकांचा विचार करता २०१६ व २०१९ या दोन वर्षीच मॉन्सून आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. २०१९ ला मॉन्सून उशिरा दाखल झाला होता तरी देखील त्यावर्षी पाऊस सर्वत्र चांगला झाला होता. त्यामुळेच मॉन्सूनच्या उशिरा आगमनाचा त्याच्या वितरणावर परिणाम होत नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. १९९७ हे वर्ष एल निनोचेे वर्ष म्हणून ओळखले गेले. त्यावर्षी मॉन्सून १२ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र उर्वरित देशांमध्ये त्याचे वितरण सुरळीत राहून देशभरात १०२ टक्के पाऊस झाल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.