पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत, त्या निमित्त पुणे शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) टीम २ ते ३ दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाली आहे. बुधवारी पंतप्रधान ज्या मार्गाने शहरात फिरणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालिम घेण्यात आली.
स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्ताची अधिकृत आकडेवारी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आली नसली, तरी हजारो अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळे स.प. महाविद्यालय परिसरासह ज्या मार्गावरून मोदींचा ताफा जाणार आहे, त्या मार्गावरील सर्व व्यावसायिक आस्थापना काही काळासाठी बंद ठेवण्यास पोलिसांनी सांगितले आहे, तसेच संबंधित रस्त्यावरील वाहतूकही टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे.
वायुसेनेचे खास विमान...
दिल्लीहून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खास विमानाने पुण्यात दाखल होतील. भारतीय वायुसेनेच्या बोईंग ७३७ बीबीजे या विमानाने मोदी शक्यतो देशांतर्गत विमान प्रवास करतात. लोहगाव येथील लष्कराच्या विशेष विमानतळावर मोदींचे आगमन होणार आहे. तेथून विशेष कारने ते शहरात विविध ठिकाणी जाणार आहेत.
एसपीजी सुरक्षा विशेष का आहे?
एसपीजी सुरक्षेबद्दल बोलायचे, तर एसपीजी कमांडोना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी)चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गुंतलेले सुरक्षा कर्मचारी बिझनेस सूट, स्पेशल ग्लासेस, कम्युनिकेशन ईअरपीस परिधान करतात. याशिवाय कमांडोंना खास बंदुका दिल्या जातात, त्या अतिशय अत्याधुनिक गन असून, त्या खास तयार केल्या जातात. कमांडो त्यांच्या सुरक्षिततेसाठी हलके वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट आणि सहकारी कमांडोशी बोलण्यासाठी ते कानात ईअर प्लग किंवा वॉकी-टॉकी वापरतात. एसपीजी जवानांसोबत एनएनएफ २००० असॉल्ट रायफल्स, ऑटोमॅटिक गन व १७ एम रिव्हॉल्व्हर यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे असतात.
माेदींचे वाहन काेणते, हे गुप्त असणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एसपीजीची सुरक्षा व्यवस्था असते. त्यांची संपूर्ण जबाबदारी पीएमओ हाउसची असते. त्यांना लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ राज्याने पुरवायचे असते. कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतीही गोष्ट त्यांच्या एसपीजी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच ती होते. पंतप्रधान मोदी यांच्या सभोवती पहिले २ सर्कल हे केंद्रीय सुरक्षारक्षकांचे कडे असते. त्यानंतर, तिसरे व चौथे सर्कल हे राज्यातील एसपीजीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या अधिकाऱ्यांचे असते.
वाहनाबाबत गुप्तता
पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात १९ वाहने असतील. त्यात तीन बुलेटप्रूफ असून, त्यापैकी कोणत्या गाडीत मोदी बसणार हे गुप्त असेल. त्याशिवाय, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रमुख नेते, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आणि शासकीय अधिकारी यांची वाहने मिळून ३५ ते ४० वाहनांचा समावेश असतो.
जॅमर वाहनही ताफ्यासोबत...
पंतप्रधानांच्या वाहनासोबत जॅमर असलेली कारही ताफ्यासोबत असते. ते कोणत्याही रेडिओ कंट्रोल किंवा रिमोट कंट्रोल डिव्हाइसला रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरापर्यंत ठप्प करतात, रिमोटद्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या बॉम्ब किंवा आयईडीचा स्फोट रोखतात.