लोणी काळभोर : आईला क्षुल्लक गोष्टीवरून शिवीगाळ केली, या कारणावरून सावत्र वडिलांशी वाद घालून त्यांचा गळा दाबून खून करून, त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचा बनाव करणाऱ्या दोन सावत्र मुलांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. गोरख सुभाष ऊर्फ मधुकर पिंपळे (वय २६) व त्याचा भाऊ बाळासाहेब ऊर्फ विशाल सुभाष ऊर्फ मधुकर पिंपळे (वय २३, दोघेही रा. कटकेवस्ती, नायगाव पेठ, ता. हवेली) या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत बाबासाहेब एकनाथ वाघ (वय ४५, रा. कटकेवस्ती, नायगाव पेठ, ता. हवेली) असे मृत वडिलांचे नाव आहे. या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार बाळासाहेब गव्हाणे यांनी दिली आहे. गोरख व बाळासाहेब दोघे जण पवळाबाई या त्यांच्या आईला पहिल्या पतीपासून झालेली मुले आहेत. पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर पवळाबाई व बाबासाहेब वाघ यांनी लग्न करून एकत्र राहत होते. ७ एप्रिल रोजी रात्री जेवणाच्या कारणावरून व बाबासाहेब पवळाबाईला सारखा शिवीगाळ करतो, या कारणावरून बराच वाद झाला. त्या वेळी गोरख याने बाबासाहेब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा गळा दाबून खून केला. खुनानंतर वाघ यांना वाहनाने धडक दिल्याचा बनाव करून दोघांनाी प्रथम कुंजीरवाडी येथील व नंतर कदमवाकवस्ती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी बाळासाहेब याने एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाल्याची खोटी माहिती डॉक्टरांना दिली होती. हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी, उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार बाळासाहेब गव्हाणे, रॉकी देवकाते, रवींद्र गोसावी या पोलीस पथकाने सर्वत्र पाहणी केली असता हा अपघात नसून खून असल्याचे या पथकाच्या लक्षात आले होते. वाघ यांच्या शरीरांवरील जखमा पाहून यांचा खून कोण करू शकतो? याबाबतच्या सर्व शक्यता पडताळून पोलीस पथकाने आपल्या तपासाची दिशा निश्चित केली. पहाट व्हायच्या आतच खून कोणी केला आहे, हे पोलीस पथकाने शोधून काढले. नंतर उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार समीर चमनशेख, रॉकी देवकाते, स्वप्निल अहिवळे, बाळासाहेब चोरमले व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार बाळासाहेब सकटे या पोलीस पथकाने खबऱ्यांमार्फत माहिती मिळवायला सुरुवात केली. एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील एका ठिकाणी छापा टाकून गोरख पिंपळेला जेरबंद केले. खूनानंतर बारा तासांच्या आत आरोपींना अटक केल्याबद्दल हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
सावत्र मुलांनी केला वडिलांचा खून
By admin | Published: April 10, 2016 4:04 AM