पुणे : पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्या घरात पत्नी व मुलांना झोपण्यास भाग पाडून मुलांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी पत्नीने पतीसह सासरच्यांविरुद्ध सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचेही म्हटले आहे़ सिंहगड पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यू व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़या प्रकरणी जान्हवी संदीप डोंगरे (वय ३०, रा़ शांतीवन आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी पती संदीप सेवक डोंगरे, सासू जनाबाई सेवक डोंगरे, सासरे सेवक पंडित डोंगरे, दीर सतीश सेवक डोंगरे, जाऊ ज्योती सतीश डोंगरे (सर्व रा़ शांतीवन, आनंदनगर) आणि मावससासू अनुसया खटाणे (रा़ बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़ त्यात सार्थक डोंगरे (वय ९) आणि साहिल डोंगरे (वय ११) यांचा मृत्यू झाला होता़संदीप तुळजाभवानी इंटरप्रायझेस येथे पेस्ट कंट्रोलचे काम करतात. घरात पेस्ट कंट्रोल करून ते विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले.रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते परत आले. पहाटे अचानक चौघांनाही उलट्यांचा व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोमवारी सकाळी संदीप यांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या घेतल्या. मात्र, सायंकाळी अचानक सार्थकला रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या. जान्हवी यांनाही त्रास होत होता. सार्थक याला ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, साहिल हाही बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जान्हवी आणि संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना दुसºया दिवशी सोडण्यात आले. त्यानंतर साहिल याचाही त्यात मृत्यू झाला होता़।शारीरिक व मानसिक छळजान्हवी यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी आपला १५ मार्च २०१० पासून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे म्हटले आहे़ तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही़ लग्न चांगले करुन दिले नाही़ तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी भेटली असती़, तू माहेरी निघून जा, असे म्हणून वारंवार मारहाण केली़ पहिल्यांदा गरोदर असताना त्यांना उपाशी ठेवून छळ केला़ दुसरा मुलगा झाल्यानंतर संदीप डोंगरे यांनी त्यांना मी याला सांभाळणार नाही, दुसरा मुलगा कशाला जन्माला घातलास, असे म्हणून मारहाण केली़ तुझ्या बापाकडून १० लाख रुपये घे, असे म्हणून त्यांना मुलासह घराबाहेर काढले होते़ त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले़ संदीप हे गेली ५ वर्षे पेस्ट कंट्रोल करण्याचे काम करीत असून, पेस्ट कंट्रोलपासून होणाºया दुष्परिणामांची जाणीव असतानासुद्धा त्यांना व मुलांना घरात झोपण्यास भाग पाडून दोन्ही मुलांच्या मृत्यूस कारणीभूत झाले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे़ सी़ गडकरी अधिक तपास करीत आहेत़
वडीलच मुलांच्या मृत्यूस कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:29 AM