पुणे : कोरोनामुळे अनेक हृदयद्रावक घटना दरदिवशी समोर येत आहेत. अशीच एक घटना सहकारनगर भागात घडली असून वेळेत उपचार न मिळाल्याने एका कोरोनाबधित ज्येष्ठ नागरिकाला वरण गमवावे लागले. एवढेच नव्हे तर अंत्यविधीसाठीही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. घरात ''शेवट''चे करायला कोणीच नसल्याने पालिकेच्या यंत्रणेमार्फत या ज्येष्ठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहकारनगर परिसरात एकाच घरात तीन ज्येष्ठ नागरिक राहतात. यातील ७२ वर्षीय ज्येष्ठाला कोरोनाची लागण झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरातच विलगिकरणात ठेवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यासोबतच्या ज्येष्ठांनी विविध रुग्णालये, कोविड हेल्पलाईन आदी ठिकाणी उपचारांसाठी प्रयत्न केले. आपला सोबती जगविण्यासाठी दोन ज्येष्ठ घरामधूनच आटोकाट प्रयत्न करीत होते. कारण त्यांनाही बाहेर पडता येत नाही की हालचाल करता येत नाही. प्रयत्न करूनही कोठेच बेड उपलब्ध होत नव्हता. हे प्रयत्न शेवटी असफल ठरले. कोरोना बाधित ज्येष्ठाचा घरातच वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला.
या ज्येष्ठाचा अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांनी स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम आणि त्यांचे पती नितीन कदम यांच्याशी संपर्क साधला. घरात कोरोनाबाधित ज्येष्ठाचा मृत्यू झाला असून त्यांचे अंत्यसंस्कार करायचे असल्याचे सांगितले. कदम यांनी पालिकेच्या यंत्रणेसह स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मदत केली. शववाहिकेची व्यवस्था करण्यात आली. परंतु, अंत्यविधीसाठी लागणाऱ्या मृत्यू पाससाठी पोलिसांच्या पंचनाम्याची आवश्यकता होती. पोलिसांना संपर्क साधण्यात आला परंतु, पोलिसांनी हात वर केले. शेवटी पालिकेच्या यंत्रणेमार्फत धनकवडी स्मशानभूमीत या ज्येष्ठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशाच स्वरूपाच्या अडचणींचा सामना शहरातील असंख्य नागरिकांना करावा लागत आहे.
------------------
दोन विद्यूतदाहिन्या तीन दिवसांपासून बंद
दक्षिण पुण्यामधील तीन पैकी बिबवेवाडी आणि कात्रज येथील कोरोना मृतदेहांसाठी असलेल्या दोन विद्युत दाहिन्या तीन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे धनकवडी स्मशानभूमी विद्युत दाहिनीवर ताण आला आहे. या ठिकाणी कोरोना अंत्यसंस्कारासाठी तीन-चार तास रांगेत थांबायला लागत आहे. कैलाश स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनी सुद्धा बंद आहे. या विद्युत दाहिन्या त्वरित सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पर्वती विभाग अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.