पुणे : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांचा सुमारे ५१७४३ मतांनी बाबाजी काळे दणदणीत विजय झाला. बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत आघाडी टिकवली. तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली. तालुक्यातील जनतेने बाबाजी काळे यांना भरभरून मते दिल्याचे दिसून आले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचा शिवसेना ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी दारुण पराभव केला. अजित पवार यांनी मोहिते यांना निवडून द्या, मंत्री करतो असा शब्द देऊनही सरळ जनतेने नाकारले. खेड आळंदी मतदारसंघात सरळ फाइट असली तरी ही निवडणूक गद्दारी विरुद्ध निष्ठावंत अशी राहीली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे हे पक्षाच्या फुटीनंतर एकनिष्ठ राहिल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी विकासकामे केली. आमदारकीची निवडणूक लढवायची या ईर्षेने त्यांनी गेली पाच वर्षे जय्यत तयारी करून जनसंपर्क ठेवला. त्यांच्या मोठ्या कुटुंबामुळे तालुकाभर त्यांची नातीगोती पसरली आहेत. त्यांना एकत्र सांधल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. दिलीप मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी फळी आधीच तयार झाली होती. मोहिते यांचे मित्रपक्षांशी बिघडलेले संबंध आणि बाबाजी काळे यांचे सर्व पक्षांशी मित्रत्वाचे संबंध यामुळे काळे यांना फायदा झाला. शरद पवार गटाचे अपक्ष फॉर्म भरलेले अतुल देशमुख यांनी माघार घेऊन बाबाजी काळे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे काळे यांना जमेची बाजू झाली.