पुणे : महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पहायचे असेल, तर महाराष्ट्रात स्थिर सरकार गरजेचे असल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनसेना पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले.
भाजप महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ घोरपडी येथे पवन कल्याण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवि, माजी मंत्री दिलीप कांबळे, उमेदवार आमदार सुनील कांबळे, आमदार चेतन तुपे, आमदार योगेश टिळेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आरपीआय (आ) शहराध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे किरण साळी, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, मंगला मंत्री उपस्थित होते.
सनातन धर्माचे स्वप्न साकार करा, असे आवाहन करून पवन कल्याण म्हणाले, मागील दहा वर्षांत एनडीए सरकारने देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. याशिवाय काश्मीरमधील कलम ३७० हटविले, अयोध्येत श्रीरामांचे आगमन झाले आहे. जागतिक पातळीवर आधी नव्हे ते आपल्या देशाचे राजकीय, सामाजिक अस्तित्व बळकट झाले आहे. यातून देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तुमची सुरक्षा तुमच्या हातात
हजारो लोकांनी बलिदान देऊन सनातन धर्म आणि राष्ट्राची रक्षा केली. आज आपली संस्कृती टिकून आहे, ती केवळ आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळे. मात्र स्वतंत्र भारतात राष्ट्र, धर्म, संस्कृती टिकविण्यासाठी बलिदान देण्याची गरज नाही; फक्त मतदान करा. तुमची सुरक्षा आता तुमच्या हातात आहे. तुमचं एक मत तुमचं भविष्य घडवणार आहे, असे मत सी. टी. रवि यांनी व्यक्त केले.