- जिल्ह्यात १६ लाख ४६ हजार मतदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार (दि. २३) पासून सुरूवात होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत १६ लाख ४६ हजार ५६३ मतदार आहेत. यात प्रथमच मतदार करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या सुमारे दीड लाखांच्या पुढे आहे.
राज्यात कोरानामुळे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यात तब्बल ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या एकाच वेळी होणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे. यात ७४६ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ६ हजार ९८० सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्याने सर्व तहसिलदारांना विशेष खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
चौकट
- जिल्ह्यात निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती : ७४६
- एकूण सदस्य संख्या : ६,९८०
- एकूण प्रभागांची संख्या : २,६९१
- एकूण मतदान केंद्रे : ३,००८
- पुरूष मतदार : ८ लाख ५९ हजार ९९६
- स्त्री मतदार : ७ लाख ८६ हजार ५५९
- नवे मतदार : १ लाख ६५ हजार
------
खर्च मर्यादा २५ ते ४५ हजार
प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक, शेड्युल बँक, सहकारी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे व या बँक खात्यातूनच सर्व खर्च करणे बंधनकारक आहे. यामध्ये ७-९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत प्रत्येकी २५ हजार, ११-१३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना ३५ हजार आणि १५-१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत ४५ हजार रुपये खर्चांची मर्यादा निश्चित केली आहे.