पुणे : सोशल मीडियाच्या काळात निवडणुकाही जास्तीत जास्त हायटेक होत चालल्या आहेत. बहुतांश राजकीय पक्षांकडून प्रभागनिहाय वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे करून नागरिकांचा कल जाणून घेतला जात आहे. या सर्वेंमध्ये निघालेल्या निष्कर्षांवरून प्रचाराची पुढील दिशा राजकीय पक्षांकडून निश्चित केली जाणार आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूकपूर्व जनमत चाचणीवर अनेक राजकीय पक्षांनी भर दिला होता. त्याचा फायदा झाल्याने आता महापालिका निवडणुकांमध्येही प्रभागनिहाय सर्व्हे करून नागरिकांचा कल जाणून घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका खासगी कंपनीमार्फत शहरातील विविध प्रश्नांबाबत सर्व्हे केला जाणार आहे. नागरिकांना शहरातील कोणते प्रश्न जास्त महत्त्वाचे वाटतात, याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानुसार प्रचारामध्ये कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, जाहीरनाम्यामध्ये कोणती आश्वासने द्यायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागील महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असाच सर्व्हे करून घेण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये मनसेही दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे अगदी अनपेक्षितपणे २९ जागा पटकावीत मनसे हा पालिकेतील दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष राहिला होता. - भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच प्रभागनिहाय पक्षाची स्थिती काय आहे, याचा सर्व्हे केला. त्यामध्ये प्रभागांतील जागांची ए, बी, सी व डी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. - ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार सर्वांत प्रबळ असेल ती जागा ए म्हणून निश्चित करण्यात आली, त्याखालोखाल बी व सी अशी वर्गवारी करण्यात आली. -ज्या ठिकाणी भाजपा अत्यंत कमजोर आहे, ती जागा डी म्हणून निश्चित केली. भाजपाच्या सी आणि डी प्रवर्गातील जागा कशा निवडून येतील, यासाठी विशेष रणनीती भाजपाकडून आखली जात आहे. या जागांसाठी इतर पक्षांकडून उमेदवार आयात करण्यावरही भर देण्यात आला. - काँग्रेस पक्षाकडूनही चांगल्या पद्धतीने सर्व्हे करून दिल्या जाणाऱ्या एजन्सीचा शोध घेतला जात आहे. शिवसेना, मनसे यांनी मात्र अजून सर्व्हेवर जास्त भर दिलेला नाही. सर्व्हेबाबत मतमतांतरेही व्यक्त केली जात आहेत, मात्र निवडणुका जास्तीत जास्त हायटेक बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वेंना महत्त्व प्राप्त होत आहे.
सर्व्हे निष्कर्षावरून निवडणूक प्रचाराची दिशा
By admin | Published: November 17, 2016 4:43 AM