पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या 15 जानेवारीला दुपारी एक वाजता बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली बैठक बोलवण्यात आली आहे. बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, यावेळी अध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये बँकेवर प्रथमच संचालक म्हणून निवडून आलेले व शिरूरचे आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावे चर्चेत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी शुक्रवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली. संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीचे सूचना पत्र नवनिर्वाचित संचालकांना पाठवण्यात येणार आहे. इच्छुक संचालकांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी वर्णी लावण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुका विचारात घेता हवेली आणि शिरूर तालुक्यातील राजकारणाला महत्त्व आले आहे. त्यामुळे आमदार अशोक पवार, विकासनाना दांगट, यांची नावे चर्चेत आली आहेत. या शिवाय प्रा.दिगंबर दुर्गाडे, विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचीही नावे चर्चेत आहेत.तर उपाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असून, त्यासाठी सुनील चांदेरे, निर्मला जागडे, संभाजी होळकर यांना संधी मिळू शकते.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्य पद्धती प्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे बंद पाकिटातून चिठ्ठीद्वारे जिल्हाध्यक्षमार्फत उमेदवार निवडीची घोषणा करणार आहेत.