पुणे : महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४१ प्रभागांमध्ये तब्बल २० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रातील त्यांच्या एक रात्र व एक दिवसाच्या जेवणाची सोय त्यांनी स्वत:च करायची आहे. त्यांना तसाच सल्ला देण्यात आला आहे. निवडणुकीवर २२ कोटी रुपयांचा खर्च होत असून, अधिकाऱ्यांचा थाटमाट तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची मात्र गैरसोय असा प्रकार यात होत आहे.मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांंना सोमवारी (दि. २०) रात्रीपासूनच केंद्रात मुक्कामी येण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात होईल. ती सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरही केंद्राच्या आवारात असतील त्या सर्व मतदारांना आत बोलावून त्यांचे मतदान करून घ्यावे लागणार आहे. केंद्राधिकाऱ्यांसह त्यांच्या सहायकांनाही या काळात केंद्र सोडून कुठेही जाता येणार नाही. त्यामुळेच एका प्रशिक्षण सत्रात काही कर्मचाऱ्यांनी जेवणाचा विषय उपस्थित केला होता. मात्र, ते तुमचे तुम्हीच पहायचे, असे त्यांना वरिष्ठांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बहुतेक कर्मचारी आपला सोमवारी रात्रीचा व मंगळवारचा दिवसभराचा डबा घेऊनच केंद्रात मुक्कामी गेले आहेत. कामासाठी नियुक्त करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटस् पुरवणे सहज शक्य असतानाही ते टाळण्यात आले आहे, अशी यातून कर्मचाऱ्यांची भावना झाली आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये काहीजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, त्यांच्या जेवणाच्या, औषध घेण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्यांनाही दुर्लक्षित करण्यात आले आहे.महापालिका निवडणुकीचा एकूण खर्च २२ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने, कर्मचारी असा बराच खर्च आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही भारी हॉटेलमधून खाद्यपदार्थ आणून गेले अनेक दिवस करण्यात येत आहे. त्या तुलनेत या कर्मचाऱ्यांचे मानधनही फार नाही. साधारण ५०० ते ७०० रुपये त्यांना देण्यात येतात. तेही या वेळी धनादेशाने थेट प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मंगळवारचा खर्च स्वत:च्या खिशातूनच करावा लागणार आहे. 1बहुसंख्य निवडणूक केंद्र शाळांमध्ये आहेत. तिथे कर्मचाऱ्यांसाठी आंघोळीची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची कसलीही व्यवस्था अनेक शाळांमध्ये नाही. सोमवारी रात्री या शाळांमध्ये झोपायचे कसे, असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला होता. घरूनच अंथरूण, पांघरून आणून काहींनी हा प्रश्न सोडविला. तसे न केलेल्यांची मात्र अडचण झाली.2मतदान प्रक्रियेत सुमारे १० हजार पोलीस ही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था मात्र पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. पोलिसांना त्यांच्या जागेवर फूड पॅकेट्स् पुरवणारी यंत्रणा पोलिसांनी विकसित केली आहे.
निवडणूक खर्च २२ कोटी, मतदानकेंद्र कर्मचारी उपाशी
By admin | Published: February 21, 2017 3:34 AM