नितीन चौधरी
पुणे: निवडणुकीच्या आखाड्यात जो जिता वही सिंकदर अशी परिस्थिती असते. निवडून येणारा एका मतानेही जिंकला तरी तो विजेताच ठरतो. त्यामुळे मताधिक्य किती मिळाले हे गौण ठरते. मात्र, पुणे जिल्ह्यात १९५१ पासून २०१९ पर्यंत १६०० पेक्षा कमी मतांनी निवडून आलेल्यांची संख्या तब्बल २० इतकी आहे. तर सर्वांत कमी मताधिक्याने १९८५ मध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपच्या अण्णा जोशी यांनी कॉंग्रेसच्या श्रीधर माडगूळकर यांच्यावर बाजी मारली होती. आजवरचा हा विक्रम ठरला आहे. त्या खालोखाल १९६२ मध्ये जुन्नर मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्षाचे विठ्ठलराव आवटे यांनी कॉंग्रेसच्या शिवाजी काळे यांचा केवळ १२७ मतांनी पराभव केला होता.
जिल्ह्यात सध्या २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात शहरात ८, पिंपरीत ३ तर ग्रामीण भागात १० मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच खरी लढत आहे. यंदाची राजकीय परिस्थिती पाहता सर्वच लढती चुरशीच्या होणार असे चित्र आहे. मात्र, जिल्ह्यात यापूर्वी सर्वात चुरशीची लढाई शिवाजीनगर मतदारसंघात १९८५ मध्ये झाली होती. त्यात या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ७१ हजार ९८२ इतकी होती. तर प्रत्यक्ष मतदान १ लाख ८६७ इतके अर्थात ५८. ६५ टक्के झाले होते. त्यात भाजपच्या अण्णा जोशी यांनी कॉंग्रेसच्या श्रीधर माडगुळकर यांचा केवळ १११ मतांनी पराभव केला होता. जोशी यांनी ४८ हजार ९६९ तर माडगुळकर यांनी ४८ हजार ८५८ मते मिळाली होती. जोशी यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ४९.०४ तर माडगुळकर यांची टक्केवारी ४८.९२ इतकी होती. जिल्ह्यातील हे मताधिक्य आजवरचे सर्वात कमी मताधिक्य ठरले आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अण्णा उर्फ रामकृष्ण झेंडे यांना केवळ ३७५ मते मिळाली होती.
जिल्ह्यातील दुसरी चुरशीची लढाई १९६२ मध्ये जुन्नर मतदारसंघात झाली होती. त्यात प्रजा समाजवादी पक्षाच्या विठ्ठलराव आवटे यांनी कॉंग्रेसच्या शिवाजी काळे यांचा केवळ १२७ मतांनी पराभव केला होता. आवटे यांना १७ हजार ८२६ मते तर काळे यांना १७ हजार ६९९ मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी अनुक्रमे ४४.५३ व ४४.२१ इतकी होती. तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी मताधिक्य १९८५ मध्येच पुणे कॅन्टोन्मेंट मदतारसंघात जनता पक्षाच्या विठ्ठल तुपे यांना मिळाले होते. तुपे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत शिवरकर यांचा १७७ मतांनी पराभव केला होता. तुपे यांना ४४ हजार ९९७ तर शिवरकर यांना ४४८२० मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी अनुक्रमे ४८.२५ व ४८.०६ इतकी होती.