इंदापूर : साखर कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे. कारखान्याची परिस्थिती ज्यांनी बिकट केली आहे, त्यांनीच या कारखान्याची अर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वत:चे पॅनल उभे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर आदी उपस्थित होते.
गारटकर म्हणाले की, सभासद व ऊस उत्पादक यांच्यावर अन्याय करून ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये टनाला कमी दिला जात आहे. या कारखान्याच्या नावावर नवीन मशिनरी खरेदी करून त्या मशिनरी स्वत:च्या खासगी कारखान्यात बसविणे तसेच ऊस वाहनांचा करार कर्मयोगीला करणे व प्रत्यक्ष या वाहनाने ऊस वाहतूक स्वत:च्या खासगी कारखान्यात करून या वाहनांचे वाहतूक पेमेंट कर्मयोगी मधून करणे अशा गैरकारभारांमुळे या कारखान्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा स्वत:चे खासगी कारखाने चालविण्यासाठी केलेला आहे. ऊस उत्पादकांचे पेमेंट जानेवारीपासून आज अखेर ९ महिने कारखान्यानी केलेले नाही. कामगारांचे दहा महिन्यांचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत. विरोधी गटातील ऊस उत्पादकांना जाणूनबुजून सभासद केलेले नाही. त्यांच्या अनामत रकमा भरून घेतल्या आहेत. परंतु त्यांना सभासद केलेले नाही. तसेच विरोधी गटातील सभासदांचे ऊस जाणूनबुजून पाच वर्षे नेलेले नाहीत आणि ऊस पुरवठा केलेला नाही. म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे. तसेच वारसा हक्काने विरोधी सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतलेले नाही.
चौकट
कारखान्यातील मोठ्या गैरकारभारामुळे कारखाना निवडणूक लढवून जिंकून जरी आणला तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल अशी स्थिती दिसत नाही. सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असणारी खूप मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. परंतु अशा योग्य व चांगल्या लोकांना जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायदेशीररीत्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही. असाही निर्वाळा गारटकर यांनी दिला.