लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या ६५ हजार गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचा प्रश्न लांबणीवरच पडतो आहे. कोरोना महामारीमुळे या संस्थांच्या निवडणुकीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.
पंचवार्षिक मुदत संपून दोन वर्षे होत आली आहे, तरीही या संस्थांमध्ये पूर्वीचेच संचालक मंडळ काळजीवाहू म्हणून काम पहात आहे. मार्च २०२० पासून सरकारने आतापर्यंत ५ वेळा स्थगितीचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या स्थगितीची मुदत ३१ ऑगस्टला संपली. त्यानंतर सरकारने स्थगिती वाढविण्याचा किंवा निवडणूक घेण्याचा असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तो त्वरित घेणे अपेक्षित आहे.
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण या निवडणुका घेते. त्यांनाही सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. ६५ हजार संस्थांच्या निवडणुकीचे त्यांनी ६ टप्पे केले आहेत. या निवडणुकीसाठी एरवी प्राधिकरण सहकार खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांची सेवा वर्ग करून घेत असते. यावेळी निवडणूक घ्यावी लागणाऱ्या संस्थांची संख्या लक्षात घेता प्राधिकरणाला अन्य खात्यांचे कर्मचारीही घ्यावे लागणार आहेत.
दरम्यान, या निवडणुका लांबत असल्याने सहकार निबंधक उपनिबंधक हे अधिकारीही आता त्रस्त झाले आहेत. सोसायट्यांमधील वाद प्राथमिक सुनावणीसाठी त्यांच्याकडे येतात. त्याशिवाय त्यांना काही सोसायट्यांमध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकही नियुक्त करावा लागतो. त्यामुळे या खात्यावर आता अतिरिक्त ताण आला आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता या प्रलंबित निवडणुका घेण्याचाही निर्णय सरकारने घ्यावा असे त्यांचे म्हणणे आहे.