पुणे : आगामी २०१९ ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. परंतु, काहीजणांना ही निवडणुक आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी तर काहींना स्वत:च्या मुलांना राजकीय क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाची वाटते आहे. भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, मागच्या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झाला होता. कोणत्याही क्षेत्रातले निर्णयच घेतले जात नव्हते. मोदी मात्र एकही क्षण वाया न घालवता काम करत आहेत. २१ व्या शतकात भारताला व्कासपथावर नेण्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. परंतु, त्यानंतरच्या दहा वर्षात काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली. गेल्या पंचावन्न महिन्यांत आता मोदी यांनी पुन्हा विकासाला वेग दिला आहे. येत्या काही वर्षातच भारत अमेरिका, चीन यांना मागे टाकील अशी स्थिती आहे. ती टिकवायची असेल तर मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी शिवाजी महाराज - अफझल खान युद्धाचा दाखला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, महाराजांनी सर्व युध्द प्रसंगात शांततेने व्यूहरचना केली. आपले चौकी पहारे जागते ठेवले. खानाचे आत आलेले सगळेच्या सगळे सैन्य त्यांनी कापून काढले. मोठा विजय मिळवला. तो आजही ऐतिहासिक समजला जातो. आताची लढाईही तशीच आहे. ती तलवारीने लढायची नाही, पण मतदानाने लढायची आहे. बूथ म्हणजे चौकी, पहारे. तिथे असणारे कार्यकर्ते म्हणजे मावळे. आज काही अफजलखान नाही, मात्र त्याची प्रवृत्ती असणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बूथ भक्कम ठेवा. ती खरी गरज आहे.
काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 7:51 PM