पुणे : निवडणूक मला नवी नाही, त्यामुळे मी उमेदवार असले तरी पक्षाने सांगितले तर बारामतीसह राज्यात सगळीकडे प्रचार करेल असा आत्मविश्वास माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला मुंडे यांनी गुरूवारी भेट दिली. आमदार माधुरी मिसाळ त्यांच्यासमवेत होत्या. मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. मुंडे बीडलोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार आहे. भेटीनंतर त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
बाहेरून कुठेही मतदार संघात जात असले की मार्गात असलेल्या भाजप उमेदवाराची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देते असे मुंडे यांनी सांगितले. तूम्हाला बीड मध्ये अडकवून ठेवण्यासाठी ऊमेदवारी दिली यावर मुंडे म्हणाल्या, "असे काहीही नाही. मला निवडणूक नवी नाही. विरोधी पक्षही या जागेवर मोठा उमेदवार देणार असे म्हणतात, मी त्या उमेदवाराचा मान ठेवेल."
मी मतदार संघातच मोठी झाले. जात वगैरे मानायची नाही अशी शिकवण आहे, त्यामुळे सर्व जातीधर्माच्या लोकांची माझी ओळख आहे, मी बीडची पालकमंत्री होते. प्रत्येक गाव मला माहिती आहे. त्यामुळे विजयासाठी मला काहीही अडचण नाही अशी खात्री मुंडे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांची मनसे किंवा अन्य कोणी महायुतीबरोबर येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे असे त्या म्हणाल्या.मुंडे यांनी नंतर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देत तिथे त्यांचा पाहुणचार स्विकारला. आमदार मिसाळ,काही स्थानिक पदाधिकारी व मोहोळ यांची तिथे चर्चा झाली. 'मोहोळ यांनी युवा मोर्चात सहकारी म्हणून काम केले आहे. मुंडे साहेबांबरोबरही ते होते. मोठी बहिण म्हणून त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले आहे'असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.