पुणे: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी नेहमीच घोषणा देत असते. पण त्या फसव्या असतात. ३७० कलम, समान नागरी कायदा या घोषणा याआधीही दिल्या होत्या, केले मात्र काहीच नाही. त्यांनी आता २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर बांधणार असा प्रचार सुरू केला आहे. भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे. परंतु, ज्याप्रमाणे नोटाबंदी एका क्षणात केली मग राममंदिर का नाही करत असा खडा सवाल उपस्थित करत निवडणुकाजवळ आल्या आहेत, आता ते राम मंदिराचा प्रचार प्रकर्षाने सुरु करतील, अशा खरमरीत शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
पक्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यातही त्यांनी भाजपा सोडले नाही. तब्बल दोन वर्षांनी पुण्यात आलो आहे असे म्हणत त्यांनी पुण्याकडे थोडे दुर्लक्षच झाले अशी खंतही व्यक्त केली.केंद्र तसेच राज्यातील भाजपाच्या सरकारच्या कारभारावरून ते स्वप्न दाखवत आहेत असेच वाटते आहे. स्वप्न पुर्ण झाली नाही की जनता काय करते हेही त्यांना समजेल. पक्ष वाढवणे हे माझे कर्तव्यच आहे. त्यासाठी त्यांना काय वाटेल याची काळजी मी करत नाही, करणार नाही. जनतेच्या अपेक्षा पुर्ण करणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहते यावर माझा विश्वास आहे असे ठाकरे म्हणाले. पुण्यात थोडी बेदिली होती, मात्र आता भक्कम एकी झाली आहे. तसे सर्वांनी मला सांगितले आहे. त्यामुळे आता पुण्याकडे बारकाईने लक्ष देणार आहे असे ते म्हणाले.नाणार प्रकल्पाला विरोध का यावर बोलताना ठाकरे म्हणाले, या प्रकल्पामुळे कोकण कोकण राहणार नाही एवढेच सांगतो. आमचा विरोध त्यासाठी आहे. नाणारमुळे समृद्धी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र निसर्गाचा विध्वंस करून येणारी समृद्धी आम्हाला नको आहे. आमचा या प्रकल्पाला कायमच विरोध राहणार आहे. तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही.विद्यापीठाचा गोंधळ दुर्लक्षित व्हावा यासाठी भगवदगीतेचा विषय काढला असावा. मी स्वत:ही त्यांनी सांगितलेले जिओ विद्यापीठ शोधतो आहे असे ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये राहून सरकारशीच कसे काय भांडता असे विचारले असता आम्ही स्वार्थासाठी भांडत नाही तर जनहितासाठी भांडत आहोत असे सांगितले. सरकारमध्ये आहे म्हणजे त्यांनी कसेही करावे व आम्ही ते मान्य करावे असे होत नाही. जे हिताचे आहे तेच मान्य करणार असे ठाकरे यांनी सांगितले.