पुणे : लोकसभा, पाठोपाठ विधानसभा, गणपती, दिवाळी यांचा बंदोबस्त, त्यानंतर एनआरसी विरोधी व समर्थनार्थ निघालेले मोर्चे असा सातत्याने बंदोबस्तात पोलीस अडकले होते. आता लॉक डाऊनच्या बंदोबस्ताने त्यावर कडी केली आहे. एका बाजूला कितीही सांगितले तरी लोक रस्त्यावर येण्याचे थांबत नाही. दुसरीकडे काठी दाखविली तर तेथून आरडाओरडा, त्यात अहोरात्र गल्ली बोळात बंदोबस्त करावा लागत असल्याने पोलीस हैराण झाले आहेत. शहरातील लॉक डाऊनच्या बंदोबस्ताचा सर्व भार पोलीस ठाण्यातील तुटपुंजा अधिकारी आणि कर्मचार्यांवर पडला आहे. दुसरीकडे नियंत्रण कक्ष आणि अन्य शाखांमधील अधिकारी आणि कर्मचारी, गुन्हे शाखेतील कर्मचारी निवांत आहेत. याबाबत एका पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, पहाटेपासून भाजी मंडई येथे बंदोबस्त लावावा लागतो. सकाळ, संध्याकाळ लोक अकारण घराबाहेर पडत आहेत. प्रत्येक जण मेडिकल नाही तर किराणाचे कारण देतो. अनेकांकडे तर सामान घेण्यासाठी साधी पिशवीही नसते. अशा वेळी पोलीस लोकांना हात जोडून किती वेळ सांगणार की घरी जा.कोरोना विषाणूचा आपल्यालाही संसर्ग होईल की काय अशी रस्त्यावर सातत्याने असलेल्या पोलिसांच्या मनात भीती आहे. मात्र, ड्युटी सोडून त्याला जाता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांवर ताण आहे.त्यावरही आम्ही उपाय करण्याचा, त्यांना जास्तीत जास्त सोयीस्कर होईल, अशा ड्युटी देण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणालाही सलग ३ तासांपेक्षा अधिक वेळ नाकांबदीची ड्युटी येणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहोत. आज नाकाबंदीची ड्युटी दिली तर दुसर्या दिवशी गस्त घालण्याची ड्युटी दिली जात आहे. त्यावेळी इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी निवांत असून सर्व भार पोलीस ठाण्यांवर टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निवडणुका, उत्सव, मोर्चे आणि आता संचारबंदी! पोलिसांच्या क्षमतेला पण मर्यादा असतीलच ना...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:37 AM
सततच्या बंदोबस्ताने पोलीस हैराण
ठळक मुद्देबंदोबस्ताचा सर्व भार पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचार्यांवर