घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका दि. २२, २३, २४, ३० नोव्हेंबर अन् ६ डिसेंबर रोजी होणार आहेत. सरपंचपदाच्या निवडणुका थेट झाल्या असल्या तरी उपसरपंच पदाची निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांमधून नवनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.
तालुक्यातील लोणी, कुशिरे बु., कोलतावडे, कानसे , गोहे बु., तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बु., निरगुडसर, पहाडदरा या दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुका दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. दि. २३ नोव्हेंबर रोजी पारगाव तर्फे अवसरी बु., जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे या दहा ग्रामपंचायतींची उपसरपंच निवडणूक होणार आहे. दि. २४ नोव्हेंबर रोजी डिंभे बु., टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे घोडा, नांदूर, बोरघर, जाधववाडी या आठ ग्रामपंचायतींची उपसरपंच निवडणूक होणार आहे. दि. ३० नोव्हेबर रोजी फलोदे व दि. ६ डिसेंबर रोजी मांदळेवाडी येथील उपसरपंच निवड होणार आहे.
उपसरपंचांची निवडणूक घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींसाठी निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत संपूर्ण प्रक्रियेतील निवडणूक नियंत्रण करणे कामी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार अनंता गवारी, जयश्री भवारी यांनी सांगितले.