पुणे : भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरून निवडणूक जिंकली. सत्ता मिळाल्यावर मात्र ते महाराजांचा अवमान स्वत: सहन करतात आणि आम्हालाही करायला लावतात. हिंमत असेल तर त्यांनी राज्यपालांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावावी, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी दिले.
शुक्रवारी रात्री पुण्यात आलेल्या सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर टीका केली. राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रात इतका मोठा रोष निर्माण होऊनही, आता विषय संपवायला हवा हे भाजपचे मत संताप आणणारे आहे. त्यांनी खरे तर राज्यपालांना तुम्ही महाराष्ट्राची जाहीर माफी मागा असे सांगायला हवे, असेही सावंत म्हणाले.सीमा प्रश्नावरही भाजप बोटचेपी भूमिका घेत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात पाऊल टाकू नये म्हणतात. तरीही सरकार या विषयाला बगल देत आहे. सीमा प्रश्नावर लढणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, असेही सावंत म्हणाले.
देशाला महागाई, बेरोजगारी या प्रश्नांनी ग्रासले आहे. त्यावर कसलीही उपाययोजना केंद्र सरकारकडून केली जात नाही. या आघाडीवर आलेले अपयश लपवण्यासाठी ते कायम हिंदू-मुस्लिम वाद पुढे करतात, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.