लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना साथीमुळे स्थगित केलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला तसा आदेश देण्यात आला आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे, उस्मानाबाद व लातूर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी ही माहिती दिली. या सर्व बँकांना येत्या २७ सप्टेंबरपर्यंत मतदारांची यादी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार सरकारने सर्वच निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यावेळी काही बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. अशा तीन बँकाच्याही निवडणुका या कालावधीत होतील असे गिरी यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणुकांनाही सरकारने कोरोनाच्याच कारणावरून आतापर्यंत पाचवेळा स्थगिती दिली आहे. आताची मुदतवाढ ३१ ऑगस्टला संपत आहे. त्यानंतर या संस्थांच्याही निवडणुका होतील. अशा ६५ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया राज्यात थांबली आहे. मुदत संपल्यानंतरही तिथे जुनेच संचालक मंडळ कार्यरत आहे. यासंदर्भात सरकारकडून ३१ ऑगस्टनंतरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.