बारामती : नीरा-भीमा नदीखोऱ्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विशेषत: माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होईल, असे चित्र आता दिसत आहे. ज्येष्ठ सहकार नेते चंद्रराव तावरे यांनी पुन्हा माळेगावच्या मैदानात दंड थोपटले आहेत. १९९७ साली तावरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ता स्थापन केली होती. त्याची पुनरावृत्ती होईल काय, अशी चर्चा आता सुरू आहे. चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे जुने गुरू-शिष्य पुन्हा एकत्र आले आहेत. केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्त्वाची आहे. माळेगाव कारखान्याच्या राजकारणात चंद्रराव तावरे मागील ४० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या सत्ता संघर्षात त्यांनी १९९७ साली पवार यांच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढविली. मोठ्या मतांच्या फरकाने त्यांचे पॅनल निवडून आले. त्याची चर्चा राज्यभर झाली. कारखान्याचा कारभार करीत असताना शैक्षणिक संकुलासह अन्य उपक्रम राबविले. त्यानंतरच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चंद्रराव तावरे व अजित पवार यांच्यात दिलजमाई केली. पुढची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, राजकीय मतभेद तावरे-पवार यांचे कायम राहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब गावडे यांचे प्रचारप्रमुख म्हणून तावरे पुढे आले. माळेगाव कारखान्याच्या सर्व कार्यक्षेत्रातील सभासदांची त्यांची ओळख आहे. त्यामुळे अजित पवार यांनीदेखील कारखान्याची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाहीर सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यंत्रणा कामाला लावली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीदेखील माळेगावच्या निवडणुकीत सक्षम पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला विरोधकांचे आव्हान तगडे असणार आहे. बारामती व इंदापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतदेखील शेतकरी कृती समितीचे पृथ्वीराज जाचक आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाणार आहे. भरणे, अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीकडे देखील लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्थापन केलेल्या नीरा भीमा साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. स्थानिक पातळीवर त्यांचे कारखान्यावर वर्चस्व आहे. मात्र, सत्ता बदलानंतरची समीकरणे महत्त्वाची ठरतात. हर्षवर्धन पाटील यांचेच नेतृत्व असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूकदेखील याच काळात होणार आहे. ‘कर्मयोगी’त पाटील यांच्यापुढे आव्हान उभे करण्यासाठी तालुक्याचे आमदार भरणे प्रयत्नशील आहेत. कै. शंकरराव पाटील यांच्या निधनानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याकडे या कारखान्याची सूत्रे आली. शंकरराव पाटील यांची मुलगी पद्मा भोसले या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंडळींकडून होत असलेला पाटील यांच्या विरोधातील प्रचार या निमित्ताने थांबेल, असे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार कायद्यातील बदल, प्राधिकरणाच्या निर्मितीच्या गदारोळात तब्बल ३ वर्षे रखडलेले सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचे वातावरण आता ढवळून निघत आहे. (प्रतिनिधी)
कारखान्यांच्या निवडणुका होणार रंगतदार
By admin | Published: February 27, 2015 11:53 PM