पुणे: देशभरात इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री वाढताना दिसत आहे. परंतु अशामध्येच पुण्यात एका दुचाकी शोरुमला आग लागून ७ इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये कोणतेही जिवितहाणी झालेली नाही. ही घटना पुणे शहरातील गंगाधाम परिसरातील एका शोरुमध्ये घडली. या भागात असणाऱ्या दुचाकी शोरूममध्ये अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या आग लागून द्या जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावं की करू नये असा संभ्रम सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.
ही आगीची घटना मार्केट यार्ड भागातील गंगाधाम परिसरात घडली आहे. इथं असणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीच्या शोरूममध्ये भीषण आग लागली होती. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली असून यावेळी शोरूममधल्या ७ इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आग लागताच लगेच अग्निशमन दलाला पाचारण केलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काहीच वेळात ही आग आटोक्यात आणली. हा प्रकार इलेक्ट्रिक वाहनांचा शोरूमध्ये घडल्यामुळे कंपनी ग्राहकांवर खापर फोडू शकणार नाही.
आग कशी लागली?
शोरूमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाहीये. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, या शोरूममध्ये इलेक्ट्रिक गाड्या चार्ज केल्या जात होत्या. त्यावेळी गाड्यांनी पेट घेतला. सध्या या लागलेल्या आगीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला आग फक्त एकाच गाडीला लागली होती. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या इतर बाइकलाही आग लागली. आग वाढल्याने या घटनेत तब्बल अर्धा डझन इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.