लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. वीजवाहक तारा जमिनीवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. नारायणवाडी, शेटे मळा, पाटे खैरे मळा परिसरातील वीजपुरवठा (दि. ३०) पासून बंद पडला आहे. गेल्या ५ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होऊन शेतीमालाचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतीपंप जळाले आहेत. पाणी असूनही शेतीला पाणी मिळत नसल्याने पिके पाण्याअभावी जळत आहे. दररोज वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित केला जातो. अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी करून वीज वितरणच्या कारभाराचे वाभाडे ग्राहकांनी काढले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत खंडित असलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन नारायणगाव विभाग वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उमेश कर्पे यांनी नारायणगाव येथे दिले . किसान क्रांती शेतकरीबांधव तालुका संघटनेच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर त्याची दखल घेत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी शेतकऱ्यांना आंदोलन न करता वीज वितरणचे अधिकारी यांच्याशी या निवेदनातील मुद्द्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक बोलविण्याची विनंती केली. त्यानुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात झालेल्या सभेत वीज ग्राहकांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखविला. या वेळी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उमेश कर्पे, सहायक अभियंता शेंडकर यांनी ग्राहकांची तक्रार समजून घेतली. याप्रसंगी सध्या असलेला वीज खंडित पुरवठा संबंधित प्रलंबित सर्व प्रश्नाबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.या वेळी नारायणवाडी येथील मुख्य रस्त्यावर वीजवाहक तार खाली आल्याने मोठी वाहने ये-जा करताना मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वायरमन कामचुकारपणा करतात. वीजसंदर्भात संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बंद पडलेला विद्युत पुरवठा वेळेवर सुरळीत करीत नाहीत. वायरमन शेतकऱ्यांच्या संपर्कात नसतात. वारवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा अनेक तक्रारी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केल्या.
वीजपंप जळाले; शेतीला पाणीही मिळेना
By admin | Published: May 13, 2017 4:16 AM