लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरणच्या जेजुरी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरातील बहुतांशी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जेजुरीतील ४०० केव्हीच्या उपकेंद्रातील बिघाडामुळे शहराला वीजपुरवठा करणारे महापारेषणचे सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडली होती. पर्वती, पद्मावती, कोथरूड, बंडगार्डन आणि रास्ता पेठ या विभागातील खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत करण्यात आला.गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला. या उपकेंद्राला कोयना व लोणीकंद वाहिन्यांद्वारे होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उपकेंद्रामधून पुरवठा होणाऱ्या पर्वती, नांदेड सिटी, कोंढवा येथील २२० केव्ही, तर रास्ता पेठेतील जीआयएस, फुरसुंगी व कोथरूड या १३२ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. या सहा उपकेंद्रांवर अवलंबून असणाऱ्या ४० उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रास्तापेठ, कोंढवा, वानवडी, हडपसर, बंडगार्डन, पर्वती, सिंहगड रोड, सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड, वडगाव, धायरी, पद्मावती, बिबवेवाडी, कोथरूड, वारजे, स्वारगेट आदी परिसरातील सुमारे नऊ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. लोणीकंद आणि चिंचवड येथील उपकेंद्रांमधून पर्यायी व्यवस्था करून रात्री हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पहिलाच मोठा पाऊस गुरुवारी रात्री पडला. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र, महावितरणच्या कस्टमर केअर टोल फ्री क्रमांकाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सुमारे ९ लाख ग्राहकांना याचा फटका बसला. परंतु, त्याकडे महावितरणने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या.
शहरातील वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित
By admin | Published: June 03, 2017 2:58 AM