धायरी : आधी अधिकारी चुका करतात अन् मग वीज खोळंबा होतो, वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावू, असा इशारा आमदार भीमराव तापकीर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नऱ्हे - धायरी भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार तापकीर यांनी अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला.
सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे - धायरी येथील बहुतांश भागात गुरुवारी दिवसभर बत्ती गुल होती. तर शुक्रवारी व शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून वीज पुरवठा बंदच अवस्थेत होता. या परिसरात वारंवार विजेचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. वारंवार होणाऱ्या विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.
दिवाळी सणाची तयारी सगळीकडे सुरू असताना अशा स्थितीत दिवसभर वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर नऱ्हेगावचे माजी उपसरपंच सागर भूमकर यांनी महावितरणचे अधिकारी, नागरिक यांच्यासह आ. तापकीर यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदारांसह संतप्त नागरिकांनी महावितरणच्या सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजप खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, अनंत दांगट, सोसायट्यांचे पदाधिकारी आदींसह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना वेठीस धरू नये...
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर 'महावितरण'च्या कार्यालयाला फोन केल्यावर कधी रेंज नाही तर कधी फोन लागत नाही, अशी स्थिती आहे. ज्या भागात फॉल्ट झाला आहे तेवढाच भागच बंद ठेवा,विनाकारण सर्व भागातील वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना वेठीस धरू नये, असे माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.