- कल्याणराव आवताडे
धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे - धायरी येथील बहुतांश भागात गुरुवारी दिवसभर बत्ती गुल होती. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून वीज पुरवठा बंदच होता, आजही (शनिवार) वारंवार वीज पुरवठा बंद पडत आहे. या परिसरात वारंवार विजेचा अनियमित पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. वारंवार होणाऱ्या विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.
दिवाळी सणाची तयारी सगळीकडे सुरू असताना अशा स्थितीत गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त झाला. या भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले. मनोरंजनाचीही साधने बंद पडत असून पंखे आणि एसीही बंद पडत असल्याने लहान मुले व ज्य़ेष्ठ नागरिक उकाड्याने हैराण झाले. काहींनी 'महावितरण'च्या कार्यालयाला फोन केल्यावर कधी रेंज नाही तर कधी फोन लागत नाही, अशी स्थिती होती.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी...
- ग्राहकाला वीजबिल भरायला थोडा जरी उशीर झाला की लगेच वीज कनेक्शन कट करण्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कार्यतत्परता दाखवतात, मग तीच कार्यतत्परता वीज खंडित झाल्यावर कुठे जाते, असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घरात वीजपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे झाले आहे, यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
- याबाबत आमच्या लोकमत प्रतिनिधीने 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, नांदेड सिटी सब स्टेशन येथे फॉल्ट झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.