पुणे : हिंजवडी येथील अलार्ड काॅलेज येथे सुरु असलेल्या महापाेर्टलवरील परीक्षेच्या वेळी वीजप्रवाह खंडीत झालेला असताना आज देखील तसाच प्रकार घडल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. 10 वाजता परीक्षा सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच वीजप्रवाह खंडीत झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. सलग दुसऱ्या दिवशी त्याच केंद्रावर वीज खंडीत हाेण्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज सकाळी हिंजवडी येथील अलार्ड काॅलेजमध्ये महापाेर्टलवर परीक्षा घेण्यात येत हाेती. या परीक्षेला राज्याच्या कानाकाेपऱ्यातून विद्यार्थी दाखल झाले आहेत. सकाळी 10 वाजता परीक्षेची वेळ हाेती. परीक्षा सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 व्या मिनिटाला वीजप्रवाह खंडीत झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. अजूनही वीजप्रवाह सुरु न झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. 100 ते 150 विद्यार्थी परीक्षा बाहेर येत आंदाेलन करत आहेत. राज्य शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मंंडळाच्या कनिष्ठ लिपीक पदासाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. काल सकाळी देखील सर्वर डाऊन झाल्याने तसेच वीजप्रवाह खंडीत झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. आज देखील सारखाच प्रकार घडला आहे.
याबद्दल बाेलताना बीडहून आलेला बालाजी कदम म्हणाला, सकाळी 10 वाजता परीक्षा सुरु झाली. परीक्षा सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात वीजप्रवाह खंडीत झाला. ताे अद्याप सुरुळीत झालेला नाही. त्याचबराेबर अनेक विद्यार्थी वेळेवर आलेले असताना त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. 9.30 च्या आत परीक्षा केंद्राच्या आत येणे अपेक्षित हाेते. काही विद्यार्थी 9.15 च्या सुमारास केंद्रात दाखल झाले. 9.30 पर्यंत त्यांचे रजिस्ट्रेशन सुरु हाेते. 9.30 नंतर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करुन घेण्यात आले नाही. 9.30 चा नियम हा केंद्राचा मुख्य दरवाजा बंद करण्याचा आहे. त्याआधी जे आत असतील त्यांचे रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे. 9.30 नंतर रजिस्ट्रेशन न घेतल्याने अनेकांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थी हे राज्यातील विविध भागातून आले आहे. त्यांचे आर्थिक नुकसान झालेच आहे, त्याचबराेबर मनस्ताप देखील त्यांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान महापाेर्टलद्वारे घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पाेर्टल बंद करण्याची विनंती केली आहे.