पिंपरी : नवरात्रौत्सवात पिंपरी चिंचवड शहर व परिसरात केवळ २८ मंडळांनी वीज वापरल्याचे महावितरकडून मिळालेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यापासून केवळ १ लाख १० हजार १०० रुपयांची अनामत मिळाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मात्र, इतर मंडळांना वीज कुठून मिळाली हा प्रश्न कायम आहे. शहर परिसरात पिंपरी, भोसरी, आकुर्डी, प्राधिकरण हे महावितरणचे उपविभाग आहेत. सर्व मंडळांकडून नवरात्रौत्सवासाठी या उपविभागाकडून वीजवापराचे परवाने घेतले जातात. पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ तीनच्या हद्दीत एकूण ४२३ नवरात्रोत्सव मंडळे आहेत. त्यातील १८४ नोंदणीकृत आहेत. २३९ मंडळांनी नोंदणी केलेली नाही. देवीच्या मंडपाची सजावट प्रामुख्याने विद्युतरोषणाईच्या झगमगाटाने केली जाते.अनेक मंडळांकडून मोठ्या स्वरुपात दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन होते. त्यासाठी मोठ्या पटांगणांमध्ये बल्बच्या माळांचा झगमगाट केला जातो. यावर्षी गणपती उत्सव झाल्यावर याच मंडपांमध्ये देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास मंडळांनी पसंती दिली. भोसरी उपविभागात भोसरी, इंद्रायणीनगर, नाशिकरोड ही शाखा कार्यालये असून दिघी, चऱ्होली, नाहरूनगर आदी परिसरात वीज पुरवठा होतो. या भागात केवळ ४ नवरात्रौत्सव मंडळांनी रितसर वीजजोड घेतले आहेत. त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचे शुल्क जमा झाले आहे.प्राधिकरण उपविभागाअंतर्गत देहूरोड, देहूगाव, प्राधिकरण, तळवडे ही शाखा कार्यालये आहेत. या भागात ६ मंडळांनी नवरात्रौत्सवात अधिकृत वीजजोड घेतला असून त्यांच्याकडून २७ हजार ६०० रुपये अनामत जमा झाली आहे. आकुर्डी उपकेंद्राअंतर्गत आकुर्डी व चिंचवड येथे शाखा कार्यालये आहेत. या भागातून फक्त ४ मंडळांंनी वीजजोड घेतले व त्यापोटी २२५०० रुपये जमा केले आहेत. पिंपरी उपकेंद्राअंतर्गत पिंपरीत २ मंडळांनी ५ हजार रुपये अनामत जमा केली आहे. दापोडीत एका मंडळाने २ हजार, खराळवाडीत एका मंडळाने ५ हजार रुपये जमा केले आहेत. चिंचवडमध्ये ३ शाखा कार्यालयांकडून ८ मंडळांनी वीजजोड घेतले असून शुल्कापोटी २० हजार रुपये जमा केले आहेत. सांगवी शाखा कार्यालयाअंतर्गत २ मंडळांनी परवानगी घेवून १० हजार रुपये रक्कम जमा केली आहे.(प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवात झाली वीजचोरी
By admin | Published: October 06, 2014 6:37 AM