केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच केशवनगर भागास एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात उन्हाळाही आहे. हा पाणीपुरवठा सकाळच्या वेळेतच होत असतो. नेमके याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे.
तसेच केशवनगर भागात अनेक वर्कर वर्क फ्रॉम होम शिपमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे संगणक चालू करण्यासाठी विजेचीच गरज असते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील नागरिक महावितरणच्या मुंढवा केशवनगर भागासाठी नेमण्यात आलेले कर्मचाऱ्यांना संपर्क केल्यास हा क्रमांक कायमच बिझी, नाहीतर बंद अशा अवस्थेत असतो. परिणामी नागरिक उपकार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त अभियंता यांच्याशी संपर्क साधतात.
मात्र, त्यांना हे अधिकारी अतिशय अरेरावीच्या भाषेत उत्तरे देत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तरी येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिन्मय वाईकर यांनी केली आहे. तसेच या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिक सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर नागरिकांनी दिला आहे.
यासंदर्भात महावितरण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.