पुणे : कंत्राटदारांमी घेतलेल्या वीजमीटर रिडींगबाबत वाढत्या तक्रारी असल्याने, त्यांच्या मीटरची फेरतपासणी होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारांच्या ५ टक्के वीज मीटरचे रिडींग घेण्याचे आदेश महावितरणचेपुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता ग्राहकांच्या दारी जावे लागणार आहे. गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’मध्ये घेण्यात आलेल्या पुणे परिमंडलाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री पंकज तगलपल्लेवार, राजेंद्र पवार, शंकर तायडे, उत्क्रांत धायगुडे, विजय भाटकर, वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण आणि परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी वाढत आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करावी, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.प्रादेशिक संचालक ताकसांडे म्हणाले, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या चालू महिन्याच्या वीजबिलांसोबतच मागील थकीत वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी सुरु असलेली मोहीम आणखी कठोरपणे राबविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांच्या मीटर रिडींग घेण्याच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनाही दरमहा ५ टक्के रिडींग घेतले पाहिजे. पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांसाठी वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून मागणी प्रलंबित असलेल्या ग्राहकांना ताबडतोब नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही करण्याची सूचना ताकसांडे यांनी दिली. सध्या ८९ टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. डिसेंबर महिन्याअखेर या संपूर्ण वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी असेही ते या वेळी म्हणाले.
अधिकाऱ्यांनाही घ्यावे वीजमीटर रिडींग : संजय ताकसांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 4:59 PM
कंत्राटदारांमी घेतलेल्या वीजमीटर रिडींगबाबत वाढत्या तक्रारी असल्याने, त्यांच्या मीटरची फेरतपासणी होणार आहे.
ठळक मुद्देकंत्राटदारांच्या ५ टक्के मीटरची पाहणी करण्याचे आदेशअधिकाऱ्यांना आता ग्राहकांच्या दारी जावे लागणार