पुणे : अकरावीची आॅनलाइन केंद्रीय प्रवेशप्रक्रिया ‘फुल प्रूफ’ असल्याचा केंद्रीय प्रवेश समितीचा दावा ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये फोल ठरला आहे. काही कॉलेजमधील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी प्रक्रियेतील नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. एका कॉलेजमधील प्रतिनिधींच्या बोलण्यातून, यामध्ये शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची बाब पुढे आली. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. अकरावीमध्ये प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाइन नोंदणी करून अर्जाचे दोन्ही भाग भरणे बंधनकारक आहे; तसेच व्यवस्थापन, अल्पसंख्याक किंवा शाळांतर्गत कोट्यातील प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहात की नाही, याची माहितीही मूळ अर्जात द्यावी लागते. या प्रक्रियेमध्ये या तीनही कोट्यातील प्रवेशासाठी स्वतंत्र अर्ज संबंधित महाविद्यालय स्तरावर द्यावा लागतो. त्याचा नमुना प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी १८ जून अखेरची मुदत आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर, कोटा व कॉलेजकोड- निहाय दि.२० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक प्रवेश कॉलेज लॉगइनमध्ये आॅनलाइन अपडेट करूनच करावा लागणार आहे; मात्र या प्रक्रियेतून न जाता, काही कॉलेज आपल्या स्तरावरच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश देण्याबाबत प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत कोणालाही, कसलाही हस्तक्षेप करता येणार नाही, सर्व प्रक्रिया आॅनलाइनच होईल, असा समितीकडून केला जाणारा दावा फोल ठरला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून याबाबतची परिस्थिती उजेडात आणली आहे. अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्याचे सांगून शहरातील एका कॉलेजमध्ये स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. कॉलेज नव्हे, ‘खुराडा’लोकमत प्रतिनिधीने कॉलेजला भेट दिल्यानंतर, ‘हे कॉलेज आहे की खुराडा’ संभ्रम निर्माण झाला. कॉलेज म्हणावे असे काहीच याठिकाणी पाहायला मिळाले नाही. एका खोलीत फायली, वह्यांचा ढीग पडला होता. त्यामुळे या कॉलेजमध्ये प्रयोगशाळा, वर्गखोल्या, ग्रंथालय कुठे आणि कशा अवस्थेत असतील, असतील की नाही, याची कल्पनाच केलेली बरी. एकही प्रात्यक्षिक नाही‘आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर, एकही प्रात्यक्षिक करावे लागणार नाही. वर्षभरात केवळ प्रात्यक्षिक परीक्षेलाच विद्यार्थ्याला बोलावले जाईल. अकरावी व बारावीसाठीही हीच प्रक्रिया असेल. आम्ही प्रात्यक्षिकाचे अधिकाधिक गुण देतो. काहींना २० पैकी २० गुणही देतो,’ असे स्पष्ट शब्दांत कॉलेजमधील प्रतिनिधीने सांगतिले. केवळ शिक्षण विभागातून अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर विद्यार्थ्याला बोलावले जाईल. त्यासाठी दोन-तीन तास यावे लागेल, असेही त्या प्रतिनिधीने नमूद केले.अकरावी प्रवेशाचा ‘बाजार’इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी एजंटांकडून पैसे घेतले जात असल्याचे प्रकार यापूर्वी घडायचे. आताही प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थी-पालकांची फसवणूक केल्याच्या घटना घडतात. पण, आता अकरावी प्रवेशाचाही ‘बाजार’ झाल्याचे दिसून येते. कॉलेजमध्ये सहजरीत्या प्रवेश मिळेल, पण कॉलेजला दररोज यायचे नसेल, पण प्रात्यक्षिकांमध्ये चांगले गुण हवे असतील, तर काही कॉलेजकडून थेट पैसे घेतले जात असल्याची गंभीर बाब समोर आली. नियमित प्रवेशशुल्क सात हजार रुपये असताना, कॉलेजकडून लेक्चरला न बसण्यासाठी लोकमत प्रतिनिधीला सवलत म्हणून १५ हजार रुपये शुल्क मागण्यात आले. यापूर्वीही एका कॉलेजने नियमित शुल्कापेक्षा दहा हजार रुपये अधिक मागितले होते.लोकमत प्रतिनिधी व कॉलेजमधील प्रतिनिधींमध्ये झालेला संवाद :लोकमत प्रतिनिधी : आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत तुमच्या कॉलेजचे नाव भरलेले नाही. कोट्यातील प्रवेश पण आॅनलाइन आहेत. त्याचाही अर्ज केलेला नाही.कॉलेज प्रतिनिधी : ते आम्ही करून घेऊ. त्याची काळजी नका करू. फक्त तुमची तयारी ठेवा. लो. प्र. : पण, या कॉलेजसाठी अर्जच केला नाही.कॉ. प्र. : दुसऱ्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाले, तरी ते बदलून घेऊ. इथे कुठलीच स्पर्धा नाही. त्यामुळे इथे प्रवेश कसा घेतला, याची कुणीच तक्रार करणार नाही. मोठे कॉलेज असते, तर तक्रार झाली असती. इथे कुणालाच त्रास नाही. लो. प्र. : म्हणजे आॅनलाइनचा काही अडथळा येणार नाही.कॉ.प्र. : अजिबात नाही. तुम्ही फक्त या प्रक्रियेत पाहिजे एवढंच. आम्ही जनरलचा प्रवेश मॅनेजमेंट कोट्यासाठी इकडं ट्रान्सफर करून घेऊ तिकडे पाठवू.लो.प्र. : बरं हे अॅडमिशन आता कसं करता येईल? कधी येऊ? ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर की मधे कधीही?कॉ. प्र. : असं काही नाही. तुम्ही कधीही या. तुम्ही जिथं अॅडमिशन मिळेल तिथं घेऊन टाका. अधिकाऱ्याकडे जाऊन कसं ‘चेंज’ करायचं ते आम्ही बघून घेऊ. फक्त आॅनलाइन अॅडमिशनचं पत्र आम्हाला लागेल. लो.प्र. : विद्यार्थ्याला इथं यावं लागणार नाही ना?कॉ. प्र. : नाही आला तरी चालेल. आमच्या अॅडमिशन फॉर्मवर फक्त त्याची सही आणा. बाकी पुढे आम्ही करू. ... तर प्रवेश नियमबाह्यकेंद्रीय आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत प्रत्येक प्रवेशाची माहिती प्रवेश समितीला आॅनलाइन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेतला, तरी त्याची माहिती आॅनलाइन समजेल. याबाबत सर्व महाविद्यालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे प्रक्रियेला डावलून एकही प्रवेश झाल्यास, तो नियमबाह्य ठरविण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांचेच नुकसान होईल. त्यामुळे असे आमिष दाखवून प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नये. महाविद्यालयांकडून असे प्रकार झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल.- मीनाक्षी राऊत, सहायक शिक्षण संचालक, पुणे विभाग व सचिव, केंद्रीय प्रवेश समिती
‘अकरावी प्रवेशा’त घुसखोरी
By admin | Published: June 18, 2016 3:27 AM