पुणे : अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम येत्या गुरुवारपर्यंत (दि. ९) नोंदवता येणार आहेत. त्याचप्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या महाविद्यालयांची संख्या ३१६पर्यंत वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेत सुमारे १० ते १२ नव्या कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाची क्षमताही वाढली आहे. विद्यार्थांना अकरावीसाठी १ लाख १२ हजार ९५६ जागा उपलब्ध झाल्या आहेत.