पिंपरी : इंधन भाववाढ सुरूच असून शुक्रवारी साध्या पेट्रोलचा भाव ९९ रुपये प्रतिलिटरवर पोहचला. पॉवर पेट्रोल १०३ रुपयांच्या घरात, तर डिझेलच्या भावाची वाटचाल ९० रुपयांच्या दिशेने सुरू झाली आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांची मतमोजणी झाल्यानंतर ४ ते २१ मे या कालावधीत इंधनदरात अकरा वेळा वाढ झाली. जवळपास दररोज इंधन दर आपला जुना विक्रम मोडून काढत आहे.
गेल्या १७ दिवसात पेट्रोलच्या भावात २.३८, पॉवर पेट्रोल २.३९ आणि डिझेलच्या भावात ३.०१ रुपयांनी वाढ झाली आहे. शहरात २७ फेब्रुवारी २०२१ रोजी साधे पेट्रोल ९७.१९, पॉवर पेट्रोल १००.८७ आणि डिझेलचा भाव ८६.८८ रुपये प्रतिलिटर होता.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने तीन आठवडे दर स्थिर ठेवण्यात आले. त्यानंतर २४ मार्च ते १५ एप्रिल या काळात पेट्रोलचे भाव हळूहळू कमी झाले या काळात पेट्रोल प्रतिलिटर ५७ आणि डिझेलचा भाव ५६ पैशांनी घटला. त्यानंतर चार मे पासून इंधनाच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
-----
दिनांक सा. पेट्रोल पॉवर डिझेल
४ मे ९६.६२ १००.३० ८६.३२
२१ मे ९९ १०२.६९ ८९.३१