पुणे : पुणे महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून सर्व अहवाल देण्यात आला आहे. आता महापालिका स्तरावर कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी संयुक्तपणे दिली.या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन आणि पुणे महापालिका प्रशासनादरम्यान नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत महापालिकेत समावेश झालेल्या अकरा गावांच्या दफ्तराची देवाण घेवाण करण्यात आली. त्यामध्ये या कर्मचार्यांसंदर्भातील माहिती देण्यात आली.पुणे महापालिकेच्या हद्दीत जिल्ह्यातील अकरा गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उंड्री, धायरी, शिवणे, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, लोहगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील दफ्तराची देवाणघेवाण झाली आहे. अकरा गावांमध्ये स्थानिक कर निधी म्हणून काही निधी जमा होता. त्यामध्ये ग्रामनिधी, पाणी पुरवठा कर, तसेच १४ व्या वित्त आयोगाचा निधी अशा निधींचा समावेश आहे. अकरा गावांमध्ये मिळून १५ कोटी २१ लाख ६७ हजार ९३ रूपये निधीची रक्कम देखील पालिकेच्या या ११ गावांच्या खात्यात जमा होणार आहे, असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ११ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५९२ कर्मचारी कार्यरत आहेत. दफ्तरांसह या कर्मचार्यांचे देखील महापालिकेत हस्तांतरण करावे लागणार आहे. या कर्मचार्यांची यादी आम्ही पालिकेला दिली आहे. परंतु, पालिकेत अद्याप या कर्मचार्यांना हस्तांतरण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्याबाबतची कार्यवाही पालिका पातळीवरून होईल. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद